About Shishuvihar Primary School, Vidyapeeth

Shishuvihar Primary School, Vidyapeeth    29-May-2023
Total Views |
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची शिशुविहार प्राथमिक शाळा विद्यापीठ शाखा  एक नामांकित अशी 53 वर्षाचा उज्वल इतिहास लाभलेली शाळा आहे. या शाळेची स्थापना 14 जून 1972 साली झाली. 1973 साली शासनाची मान्यता मिळाली. एसएससी बोर्ड चा अभ्यासक्रम राबविणारी मराठी माध्यमाची खाजगी अनुदानित शाळा आहे. शाळेमध्ये इयत्ता पहिली ते सातवी सेमी इंग्लिश मध्ये अभ्यासक्रम शिकविला जातो. 


पुणे विद्यापीठातील म्हणजेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रोफे सरांच्या पाल्यांची शिक्षणाची अडचण आणि वाहनांची नसलेली सोय या कारणाने विद्यापीठातील प्राध्यापकांनी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची संपर्क करून विद्यापीठ आवारामध्ये ही शाळा सुरू करण्यास विनंती केली.127 वर्ष शिक्षण क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणाऱ्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेला शाळा सुरू करण्यासाठी पुणे विद्यापीठाने विद्यापीठाचा निसर्गरम्य परिसर दिला.
 
प्राध्यापकांच्या मुलांबरोबरच सेवकांची मुले ही या शाळेत शिक्षण घेऊ लागली. मुलांकडे असणारे वैयक्तिक लक्ष शिकवण्याची उत्तम हातोटी, आपलेपणा, प्रेमळ स्वभाव पालकांशी बोलण्याची उत्तम पद्धत असा शाळेचा प्रसार होऊन 25 ते 28 मुलांपासून 1200 मुलांपर्यंत शाळेत प्रवेश झाले. शिक्षकांना 'बाई'न म्हणता 'ताई' असे संबोधले जाते हे पालकांना खूपच आवडले. संस्थेच्या शिक्षकांच्या व मुख्याध्यापकांच्या योगदानाने पुण्यातील नावाजलेली शाळा म्हणून ओळखली जाते.
या शाळेत शिक्षण घेऊन अनेक नामवंत कलाकार, अभिनेते ,डॉक्टर ,इंजिनिअर्स , समाजसेवक, उत्तम नागरिक व सेवक म्हणून आपले काम करत आहेत.
 
शाळेचा निसर्गरम्य परिसर रवींद्रनाथ टागोर यांच्या "शांती निकेतन" ची आठवण करून देतो. खेळासाठी प्रशस्त मैदान आहे. शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन मिळते.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि एकविसाव्या शतकामध्ये पदार्पण करणाऱ्या या विद्यार्थ्यांचे आधुनिक तंत्रज्ञान वाढावे यासाठी अद्ययावत संगणक कक्ष, ई -लर्निंग सुविधा उत्तम मार्गदर्शनाखाली मिळते. डिजिटल क्लास रूम्स आहेत.अद्ययावत प्रयोगशाळा स्वतंत्र आहे. वाचन कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी परिपूर्ण असे ग्रंथालय आहे. विद्यार्थ्यांसाठी मूलभूत स्वच्छता सोयी उपलब्ध आहेत.
 
स्पोकन इंग्लिश ,बाह्य स्पर्धा यांची उत्तम तयारी, कला नाट्य, वकृत्व ,संगीत इत्यादी क्षेत्रात मुलांचे तयारी करून घेतली जाते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आवारात शाळा असल्याने तेथील सर्व विज्ञान भाषा, ललित कला केंद्र इत्यादी विभागातील तज्ञांचे विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन मिळते. विज्ञान प्रयोगांचे प्रात्यक्षिक, सर्व विभागांची क्षेत्रभेट प्रत्यक्ष मुलांना मिळते. आयुका, PKC,CSEC इत्यादी विभागांच्या विज्ञान कार्यक्रमात शाळेचा सहभाग असतो.
 
माजी विद्यार्थी मेळावा घेतला जातो. सहशालेय उपक्रम, राष्ट्रीय सण विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आणि संस्कृतीची जपवणूक करण्यासाठी घेतले जातात.
 
सर्व गुणसंपन्न व उत्तम नागरिक बनविणे हे शाळेचे ध्येय आहे.